छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जालाननगर येथील प्लॉट स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवून, खोट्या जीपीए व बनावट कागदपत्रांच्या आधारे पशुधन विकास अधिकार्याची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जानेवारी २०२३ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान घडला. ब्रोकरसह पाच जणांविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद एजाज मोहम्मद रियाज, ताजुन्नीसा बेगम मोहम्मद एजाज, मोहम्मद इम्तियाज मोहम्मद एजाज, मोहम्मद अदनान मोहम्मद एजाज (सर्व रा. आरेफ कॉलनी) आणि शविकुमार घुरेलाल चव्हाण (रा. अमोदी हिल्स, पहाडसिंगपुरा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकरणात महापालिकेचे पशुधन विकास अधिकारी शेख शाहेद शेख निजाम (वय ५५), रा. जालाननगर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जानेवारी २०२३ मध्ये ओळखीचा ब्रोकर मोहम्मद रियाज व त्याचा मुलगा अदनान यांनी जालाननगर येथील सीटीएस क्रमांक १८८९४, क्षेत्रफळ १४७.३ स्क्वेअर मीटर असलेला प्लॉट विक्रीस असल्याचे सांगितले. हा प्लॉट स्वतःच्या मालकीचा असल्याचे सांगत तसेच नर्मदाबाई अग्रवाल यांच्या नावावरून जीपीए घेतल्याचा दावा करत आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. प्लॉटवर एजाज यांच्या नावाचा बोर्ड लावलेला असल्याने फिर्यादी व त्यांच्या पत्नीने प्रत्यक्ष पाहणी करून खात्री केली.
यानंतर ४७ लाख रुपयात व्यवहार निश्चित करण्यात आला. त्यापैकी २५ लाख रुपये धनादेशाद्वारे, ४ लाख रुपये ऑनलाइन व ६ लाख रुपये रोख अशा एकूण ३५ लाख रुपयांची रक्कम आरोपींना देण्यात आली. उर्वरित १२ लाख रुपये दिल्यानंतर खरेदीखत करून देण्याचे आश्वासन देत १६ फेब्रुवारी २०२३ रोजी करारनामा करण्यात आला होता.














